कायदा-सुव्यवस्था, ध्वनीप्रदूषण व सामाजिक जनजागृतीबाबत पोलिसांचे मार्गदर्शन
निलेश मोरे
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज सायंकाळी ५.५५ ते ६.४५ या वेळेत आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा. कदम सो., उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग, बारामती हे होते.
बैठकीमध्ये गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन करून साजरा करण्याबाबत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विविध सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.
गणेश मंडळांनी इतर सर्व संबंधित विभागांची संमती घेऊन परवानगी अर्ज विहित मुदतीत दाखल करावेत, तसेच मंडपामध्ये CCTV कॅमेरे बसवावेत. मंडळांनी २४ तासांसाठी किमान दोन स्वयंसेवकांची नियुक्ती करून आवश्यक दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.
फ्लेक्स व बॅनरवर धार्मिक भावना दुखावतील अथवा आक्षेपार्ह स्वरूपाचे संदेश प्रदर्शित करू नयेत. तसेच सराईत गुन्हेगारांचे फोटो कोणत्याही प्रकारे लावू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले. फ्लेक्स-बॅनरसाठी संबंधित विभागाची परवानगी घेऊन ते विहित मुदतीत काढून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘नो ड्रग्स’, ‘सेव्ह चाईल्ड’, वृक्षसंवर्धन, वाहतूक नियमांचे पालन यांसारख्या समाजहितकारक विषयांवर जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.
मिरवणुकीच्या मार्गात कोणताही बदल करू नये. मशिदी, शासकीय कार्यालये तसेच रुग्णालयांच्या परिसरात स्पीकर बंद ठेवावेत आणि ध्वनीप्रदूषणासंदर्भातील कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच गणेश विसर्जन घाटावर आवश्यक ती दक्षता घेण्याबाबतही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान, भिगवण पोलीस स्टेशन व भिगवण पत्रकार संघ यांच्या संयुक्त सहभागातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन गणेश मंडळांची निवड करून त्यांना बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
गणेशोत्सव काळात वरील सूचनांचे पालन न केल्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
गणेशोत्सव हा सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि शांततेचा संदेश देणारा उत्सव ठरावा, यासाठी सर्व गणेश मंडळांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.







