निलेश मोरे
उजनी जलाशयातील प्रस्तावित मच्छीमारी ठेक्याला विरोध करण्यासाठी उजनी मच्छीमार बचाव अभियानाच्या वतीने तक्रारवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला पूर्वसूचना देण्यात आली आहे.
उजनी जलाशयावर पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या स्थानिक मच्छीमार बांधवांच्या रोजगार व उपजीविकेचा प्रश्न प्रस्तावित मच्छीमारी ठेक्यामुळे निर्माण होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सदर ठेक्याला विरोध करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तक्रारवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शांततामय व लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या माध्यमातून स्थानिक मच्छीमारांची भूमिका तसेच त्यांच्या विविध मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहेत.
उपोषण शांततामय व कायदेशीर पद्धतीने करण्यात येणार असून, सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहील, याची काळजी घेण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच उपोषणाच्या दिवशी ग्रामपंचायतीकडे स्वतंत्र निवेदन सादर करून त्याची नोंद घेण्यात यावी आणि संबंधित प्रशासनामार्फत हे निवेदन शासनाकडे पाठवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनाची पूर्वसूचना उजनी मच्छीमार बचाव अभियानाच्या वतीने ग्रामविकास अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.







