भिगवणमध्ये ४ तर मदनवाडीत ३ दहीहंड्यांचा थरार; गोविंदा पथके सज्ज
निलेश मोरे
भिगवण शहरासह मदनवाडी परिसरात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, गोविंदा पथके थर रचण्यासाठी सज्ज झाली आहेत. यंदा भिगवण शहरात चार, तर मदनवाडी येथे तीन दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात दहीहंडीच्या थराराची उत्सुकता निर्माण झाली आहे. या विविध कार्यक्रमांना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती राहणार आहे.
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध मंडळांकडून जोरदार तयारी सुरू आहे. शहरातील चौकाचौकांत आकर्षक फलकबाजी करण्यात आली असून, साऊंड सिस्टिम, लाईट शो, स्क्रीन यंत्रणा आणि व्यासपीठ उभारणीचे काम सुरू आहे. दहीहंडी मंडळांकडून उत्सवाची इतर तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे महिला गोविंदा पथकांचाही सहभाग असणार आहे. त्यामुळे पारंपरिक उत्साहासोबत महिलांच्या सहभागामुळे दहीहंडी उत्सवाला नवा रंग मिळणार आहे.
सोमवार, ७ सप्टेंबरला भिगवणमध्ये दहीहंडीचा थरार
सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी भिगवण शहरात विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी चषक, रोहित शेलार मित्र परिवाराच्या वतीने, तर दुर्गामाता मंदिर परिसरात कृषीमंत्री चषक आयोजित करण्यात आला आहे. हर्षल भोसले, प्रेम लोंढे, प्रेम भोसले, पप्पू थोरात व भिगवण युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच अहिल्यादेवी चौकात जय मल्हार मित्र मंडळ व सचिन खडके मित्रपरिवाराच्या वतीने, तर श्रीगणेश चौकात श्रीराम चषक आयोजित करण्यात आला आहे. अनिकेत जमदाडे व करण थोरात मित्रपरिवार यांच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
मदनवाडीत महिलांच्या गोविंदा पथकांचा थरार
याच दिवशी मदनवाडी येथील अहिल्यादेवी होळकर चौकात श्री हनुमान दहीहंडी उत्सव पत्रकार चषक खास महिलांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. दहीहंडी फोडण्यासाठी मुंबईहून जुनी जोगेश्वरी महिला गोविंदा पथक व जुना काळभैरवनाथ गोविंदा पथक सहभागी होणार आहे. जिल्हा परिषद सदस्य मेघनाताई बंडगर व तुकाराम बंडगर यांच्या वतीने हा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
१० सप्टेंबरला मदनवाडीत पुन्हा जल्लोष
गुरुवार, दि. १० सप्टेंबर रोजी मदनवाडी येथे पुन्हा दहीहंडीचा जल्लोष रंगणार आहे. अहिल्यादेवी होळकर चौकात समृद्धी प्रतिष्ठानच्या वतीने कुंडलिक बंडगर व तेजस देवकाते मित्रपरिवार यांच्या वतीने, तसेच जय हनुमान दहीहंडी उत्सव स्वप्निल बंडगर मित्रपरिवाराच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष भर
दहीहंडी उत्सवाला मोठ्या संख्येने गोविंदा पथके आणि नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने भिगवण शहरात विशेष सुरक्षा व्यवस्था व वाहतूक नियोजन करण्यात येत आहे. नागरिकांना उत्सवाचा आनंद सुरक्षितपणे घेता यावा, यासाठी प्रशासनासोबतच आयोजकांकडूनही आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान, दहीहंडी उत्सवासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, मान्यवर उद्योजक तसेच सेलिब्रिटींना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवाला राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीची रंगत लाभणार आहे.







