खास महिलांसाठी दहीहंडी; मुंबईतील महिला गोविंदा पथके सज्ज — शेतकरी व आदर्श मातांचा होणार सन्मान
निलेश मोरे
मदनवाडी परिसरात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, महिला गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी थर रचण्यास सज्ज झाली आहेत. यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे खास महिलांसाठी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांच्या सहभागामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवाला ग्रामीण भागातही उत्साह निर्माण झाला आहे तर सामाजिक आणि सांस्कृतिक रंगही भरणार आहे.
मदनवाडी येथील अहिल्यादेवी होळकर चौकात श्री हनुमान दहीहंडी उत्सव पत्रकार चषक खास महिलांसाठी आयोजित करण्यात आला आहे. या दहीहंडी सोहळ्यात दहीहंडी फोडण्यासाठी मुंबईहून जुनी जोगेश्वरी महिला गोविंदा पथक तसेच जुना काळभैरवनाथ गोविंदा पथक सहभागी होणार आहे. त्यामुळे महिला गोविंदा पथकांच्या थरारक कामगिरीकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद सदस्य मेघनाताई तुकाराम बंडगर यांच्या वतीने या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तर पत्रकार संघाचे संस्थापक दादासाहेब थोरात यांनी महिलांची थीम तयार केली असून महिलांच्या नेतृत्व, कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देन्यायाचा प्रयत्न केला आहे. सन्मान करण्याच्या उद्देशाने हा विशेष उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी संतोष ढवळे यांनी सांगितले.
याच कार्यक्रमादरम्यान परिसरातील ज्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात दूध संकलन केले जाते, अशा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या आदर्श मातांचाही विशेष गौरव करण्यात येणार आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळणार आहे.
दरम्यान, या उत्सवासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, मान्यवर उद्योजक तसेच सेलिब्रिटींना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवाला राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीची रंगत लाभणार आहे.
महिला गोविंदा पथकांचा थरार, दहीहंडी फोडण्याची चुरस, शेतकरी व आदर्श मातांचा सन्मान आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे मदनवाडीतील यंदाची दहीहंडी लक्षवेधी ठरणार असून, उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.







