निलेश मोरे
मदनवाडी परिसरात आज अहिल्यादेवी होळकर चौकात दहीहंडीचा जल्लोष रंगणार आहे. गोविंदा पथकांकडून थर रचण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून, दोन दहीहंड्यांच्या आयोजनामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मदनवाडी येथे आयोजित दहीहंडी उत्सवांना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती सचिन अहिर, खासदार निलेश लंके तसेच आमदार राहुल कुल यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. चौकांत आकर्षक फलकबाजी करण्यात आली असून, साऊंड सिस्टिम, लाईट शो, मोठ्या स्क्रीनची व्यवस्था तसेच व्यासपीठ उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गोविंदा पथकांकडूनही दहीहंडी फोडण्याची नागरिकांना उत्सुकता लागली आहे.
यंदाच्या उत्सवाचे आकर्षण म्हणून समृद्धी प्रतिष्ठान कडून राधा पाटील मुंबईकर, तसेच प्रसिद्ध बैलगाडा मालक राहुल पाटील, व सिनेअभिनेता देवेंद्र गायकवाड तसेच जय हनुमान दहीहंडी उत्सव कडून स्नेहा पिंपरीकर तसेच डीजे कायरा यांच्या कार्यक्रमाने रंगत वाढणार आहे.
अहिल्यादेवी होळकर चौकात समृद्धी प्रतिष्ठानच्या वतीने कुंडलिक बंडगर व तेजस देवकाते मित्रपरिवाराच्या वतीने, तसेच जय हनुमान दहीहंडी उत्सव स्वप्निल बंडगर मित्रपरिवाराच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियोजनावर विशेष भर देण्यात येत आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, दहीहंडी उत्सवासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, राजकीय, सामाजिक, उद्योजक, तसेच सेलिब्रिटींची उपस्थिती लाभणार आहे.







