(संतोष पवार)
पळसदेव तालुका इंदापूर येथील पळसनाथ विद्यालयाच्या खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करत आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्यालयाचे खेळाडू शालेय विभागीय कुस्ती स्पर्धा आणि बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत शालेय राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत पोहोचले आहेत.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा शिक्षण संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत कन्या विद्यामंदिर लोणी प्रवरा जि.अहिल्यानगर येथे पुणे विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
या स्पर्धेत पळसनाथ विद्यालयाच्या सृष्टी सावता बनसुडे या खेळाडूने ४८ किलो वजनगट आणि १९ वर्षीय गटातून प्रथम क्रमांक मिळवला तिची अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर आणि अभिनव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाशिंबे ता. करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ ते ६ ऑक्टोबर रोजी विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन अभिनव विद्यालय वाशिंबे येथे करण्यात आलेले होते.
या स्पर्धेत पळसनाथ विद्यालयाचे मल्ल सौरभ वीरकर (७०किलो वजनगट ) ज्ञानेश्वरी शिंदे (४६ किलो वजनगट) गायत्री शिंदे (४९ किलो वजनगट) यांनी शालेय विभागीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला त्यांची राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली .
विशेष बाब म्हणजे विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत विद्यालयातील तब्बल सहा मल्लांनी दमदार कामगिरी करत उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण केले . क्रीडाक्षेत्रातील या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.दरम्यान विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत श्रावणी शिनगारे गणेश लवटे आणि यशराज जाधव हे मल्ल उपविजेते ठरले.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सर्व खेळाडूंचे आणि मार्गदर्शक क्रीडाशिक्षक सिकंदर देशमुख,नितीन जगदाळे ,सुवर्णा नायकवाडी, रामचंद्र वाघमोडे यांचे पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे , सचिव योगीराज काळे , शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य ,पर्यवेक्षक यांनी अभिनंदन केले आहे .







