मनोहर भोसलेशी संबंधित कथित आर्थिक व्यवहार आणि संघटित गुन्हेगारीच्या तपासानंतर SITची कारवाई; रामदास झोळ पसार असल्याचा पोलिसांचा दावा, पत्नी माया झोळ यांच्यासह आठ जणांवर मकोका
(निलेश मोरे)
मनोहर भोसले, रामदास झोळ, त्यांची पत्नी माया झोळ यांच्यासह आठ जणांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सोलापूरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सोलापूरचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने ही कारवाई केली. पोलिसांच्या तपासानुसार, मनोहर भोसले याच्याशी संबंधित कथित आर्थिक व्यवहार आणि संघटित गुन्हेगारीच्या तपासात प्रा. रामदास झोळ आणि त्यांच्या संस्थेशी संबंधित काही बाबी समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांच्या आरोपानुसार, मनोहर भोसले याच्याकडून अघोरी प्रथा, जादूटोणा आणि अंधश्रद्धेच्या माध्यमातून कथितरीत्या आर्थिक व्यवहार करण्यात आले. या माध्यमातून मिळवलेल्या कथित बेकायदेशीर पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी रामदास झोळ यांनी मदत केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. तसेच, हा पैसा झोळ यांच्या ‘दत्तकला शिक्षण संस्थे’मध्ये गुंतवल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
मनोहर भोसले याच्याविरोधात भोंदूगिरी, आर्थिक फसवणूक, जमीन बळकावणे आणि लैंगिक छळासह विविध आरोपांप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली असून तो सध्या तुरुंगात आहे.
दरम्यान, रामदास झोळ हे या प्रकरणात पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासात रामदास झोळ यांच्या पत्नी माया झोळ यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. संस्थेशी संबंधित काही अन्य सहआरोपींना यापूर्वीच एसआयटीने अटक केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये मनोहर भोसले आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींविरोधात फसवणूक तसेच इतर गुन्हे दाखल आहेत. या विविध गुन्ह्यांमधील कथित संबंध आणि संघटित स्वरूप लक्षात घेऊन सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मकोका लागू करण्याची कारवाई केली आहे. या प्रकरणातील आरोपांचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेत होणार असून, आरोपींवरील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.







