(निलेश मोरे)
स्वामी चिंचोली हद्दीमध्ये सर्विस रोडचे काम संथगतीने सुरू असल्याने विद्या प्रतिष्ठान अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलकडे जाणारा रस्ता उकरण्यात आला आहे. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी जाणाऱ्या स्कूल बस, दुचाकीस्वार महिला आणि इतर नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला आवश्यक बॅरिकेड्स नसल्याने विद्यार्थ्यांसह वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, संभाव्य अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सर्विस रोडचे काम सुरू असताना शाळेकडे जाणारा रस्ता उकरण्यात आल्याने वाहतुकीचा मार्ग अडचणीचा झाला आहे. परिणामी, स्कूल बससह इतर वाहनांना थेट हायवेवरून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे, आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या महिलांनाही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. काही वाहनचालकांना विरुद्ध दिशेने प्रवास करण्याची वेळ येत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.
शाळेत जाणाऱ्या लहान विद्यार्थ्यांची वाहतूक दररोज होत असताना रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या आवश्यक उपाययोजना नसल्याचे चित्र दिसत आहे. रस्त्याच्या कडेला बॅरिकेड्स नसल्याने वाहनचालकांना पुढील मार्गाचा अंदाज घेणे कठीण होत असून, हायवेवरील वेगवान वाहतुकीमुळे एखादी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः सकाळी शाळेत जाण्याच्या आणि विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाण्याच्या वेळेत ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते.
सर्विस रोडचे काम सुरू असताना वाहतुकीसाठी सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, कामाच्या ठिकाणी ठळक बॅरिकेड्स लावणे आणि वाहनचालकांना योग्य दिशेने मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने प्रशासनाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
संबंधित प्रशासन आणि रस्त्याच्या कामाची जबाबदारी असलेल्या यंत्रणेने तातडीने लक्ष घालून रस्त्याच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावावेत किंवा सुरक्षित पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी, तसेच सर्विस रोडचे काम गतीने पूर्ण करावे, अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे. विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित या प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता संभाव्य अपघात टाळण्यासाठी त्वरित कार्यवाही करणे गरजेचे आहे.







