जड वाहनांना बंदी असतानाही वाहतूक सुरू; पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
(निलेश मोरे)
इंदापूर आणि करमाळा तालुक्यांना जोडणाऱ्या भीमा नदीवरील डिकसळ येथील ब्रिटिशकालीन पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी असतानाही ऊस गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टर-ट्रॉली या पुलावरून जात असल्याचे चित्र दिसत आहे. पुलाची जीर्ण अवस्था आणि वाढती जड वाहतूक लक्षात घेता संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
भीमा नदीवरील डिकसळ येथील हा पूल ब्रिटिशकालीन असून, त्याची उभारणी सुमारे १८५५ मध्ये झाल्याचे सांगितले जाते. पुलातील दगड सैल झाल्याच्या पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली होती. पुलाच्या दोन्ही बाजूंना जड वाहनांना प्रवेशबंदी असल्याचे फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, ऊस वाहतुकीच्या हंगामात भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलींची वर्दळ वाढल्याचे दिसत असल्याने या बंदीची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
पुलाच्या एका बाजूला जड वाहनांना रोखण्यासाठी असलेल्या अडथळ्यांची परिणामकारकता कमी झाल्याचे दिसत आहे. तसेच पुलाजवळील रस्त्यावर मोठा खड्डा असून, त्याच्या बाजूने पर्यायी वाट काढून वाहने जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बंदी असूनही जड वाहनांना प्रवेश मिळत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून अडथळे अधिक प्रभावी करण्यासह आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, डिकसळ पुलाजवळील रस्त्यावर नुकतीच ऊसाची ट्रॉली उलटल्याची घटना घडली. यामुळे परिसरात वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या रांगा सुमारे दोन ते तीन किलोमीटरपर्यंत लागल्याचे सांगण्यात आले. ही घटना पुलावर घडलेली नसली, तरी या मार्गावरील वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
डिकसळचा हा पूल पूर्णपणे बंद पडल्यास परिसरातील सीमावर्ती गावांमधील नागरिकांना भिगवणमार्गे प्रवास करण्यासाठी सुमारे ४० किलोमीटरचा अतिरिक्त वळसा घालावा लागू शकतो. त्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी आणि दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. स्थानिक नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेला हा मार्ग सुरक्षित राहणे अत्यंत आवश्यक आहे.
संभाव्य धोका टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या करमाळा व भिगवण येथील संबंधित यंत्रणांनी संयुक्त पाहणी करावी, पुलाची सद्यस्थिती तपासावी, जड वाहनांना रोखणाऱ्या अडथळ्यांची दुरुस्ती करावी आणि प्रवेशबंदीची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा वेळीच खबरदारी घेऊन पुलाची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन आता याकडे किती गांभीर्याने लक्ष देते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.







