पारवडी सबस्टेशनसमोर आंदोलनाचा इशारा; वीज समस्येमुळे शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ त्रस्त
(निलेश मोरे)
बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर निंबोडी गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, अनियमित वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. गावातील वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्यात यावा, अन्यथा शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ पासून पारवडी सबस्टेशनसमोर गुराढोरांसह हलगी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
सिद्धेश्वर निंबोडी हे बारामती तालुक्यातील टोकाचे गाव असल्याने येथील वीजपुरवठ्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. गावात सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत लोडशेडिंग होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यातच महावितरणकडून कोणतीही निश्चित वेळ न पाळता वारंवार वीज बंद केली जात असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वीजपुरवठा खंडित होत असल्याचा मोठा फटका विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला बसत आहे. तसेच गावातील पाणीपुरवठा व्यवस्थाही विस्कळीत झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना विजेची वाट पाहावी लागत आहे. दिवसभरात केवळ काही तास वीज उपलब्ध होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. सिंगल फेज वीजपुरवठाही वारंवार खंडित होत असल्याने अडचणींत आणखी भर पडत आहे.
शेतीसाठी आवश्यक असलेला थ्री फेज वीजपुरवठाही नियमानुसार आणि नियमितपणे मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पावसाअभावी आणि पाण्याच्या कमतरतेमुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना अनियमित वीजपुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे. हाताशी आलेली पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
गावातील सिंगल फेज फिडर सुरू करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, वारंवार मागणी करूनही संबंधित काम मार्गी लागत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळे महावितरणने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
गावातील वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास १६ ऑक्टोबरपासून पारवडी सबस्टेशनसमोर गुराढोरांसह हलगी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
ग्रामस्थांची प्रतिक्रिया
दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आधीच संकटात असताना, हाताशी आलेली पिके थोड्याफार उपलब्ध पाण्याअभावी जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तलावात काही प्रमाणात पाणी उपलब्ध असतानाही वीजपुरवठा नसल्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दिवसभर प्रतीक्षा करावी लागत आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना महावितरणने तातडीने लक्ष देऊन निंबोडी गावातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.







