बीएनएचएसच्या प्रयत्नांना यश; जैवविविधता पुनर्स्थापनेसाठी भिगवण येथे विशेष उपक्रम
(निलेश मोरे)
वाढते जलप्रदूषण आणि बेसुमार मासेमारीमुळे संकटात सापडलेल्या उजनी जलाशयातील देशी मत्स्यसंपदा पुन्हा समृद्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबईच्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) पुढाकारातून दुर्मीळ देशी माशांचे संवर्धन, मत्स्यबीज सोडणे आणि नष्ट होत चाललेल्या पाणवनस्पतींची पुनर्लागवड करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामुळे उजनीच्या जैवविविधतेला नवी उभारी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
गेल्या काही वर्षांत जलप्रदूषण, बारीक जाळ्यांचा वाढता वापर आणि अतिमासेमारीमुळे उजनीतील अनेक देशी माशांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. याचा परिणाम जलाशयातील नैसर्गिक अन्नसाखळीवर तसेच स्थानिक मच्छिमारांच्या उपजीविकेवरही झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन बीएनएचएसचे सहाय्यक संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उन्मेष काटवटे यांच्या मार्गदर्शनाखाली देशी मत्स्यसंपदेच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विविध भागांतून दुर्मीळ देशी माशांचे संकलन करून त्यांच्या प्रजननासाठी प्रयत्न करण्यात आले. तसेच महाशीर या दुर्मीळ माशाच्या संवर्धनासाठी टाटा पॉवर कंपनीने लोणावळा येथील प्रकल्पातून सहकार्य केले आहे. येत्या शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी जुने भिगवण येथे उजनी जलाशयाच्या जैवविविधता संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या वेळी महाशीर, बोबरी, कवडस यांसह रोहू, कटला आणि मृगल या माशांचे मत्स्यबीज जलाशयात सोडण्याबरोबरच पाणवनस्पतींच्या पुनर्लागवडीवर भर दिला जाणार आहे.
या कार्यक्रमाला राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे, जहांगीर हॉस्पिटलचे प्रमुख एच. सी. जहांगीर, टाटा पॉवरचे जैवविविधता प्रमुख विवेक विश्वासराव, सिप्ला फाउंडेशनचे प्रमुख अनुराग मिश्रा, प्रादेशिक उपआयुक्त विजय शिखरे, यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी आणि स्थानिक मच्छिमार उपस्थित राहणार आहेत.
बीएनएचएसच्या या उपक्रमामुळे उजनी जलाशयातील नैसर्गिक परिसंस्थेचे पुनरुज्जीवन होण्यास मदत होणार असून, स्थानिक मच्छिमारांच्या रोजगाराचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मोठी मदत होणार आहे असा विश्वास डॉ.उन्मेष काटवटे व भरत मल्लाव यांनी व्यक्त केला. देशी माशांचे संवर्धन, पाणवनस्पतींचे पुनरुज्जीवन आणि जलाशयाचा पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.






