महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उद्या भेट; १६ ऑक्टोबरचे हलगी आंदोलन स्थगित
(निलेश मोरे)
निंबोडी : बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर निंबोडी गावातील वीजपुरवठा अखेर सुरळीत झाला असून, लोकव्हिजन न्यूजने या प्रश्नाला वाचा फोडल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
दि. ८ ऑक्टोबर रोजी पारवडी उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. महावितरणने दुरुस्ती करून १० ऑक्टोबर रोजी ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित केला. यापुढेही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची ग्वाही अधीक्षक अभियंता लाहमगे यांनी दिली आहे.
दरम्यान, आरडीएसएस योजनेअंतर्गत पारवडी व निंबोडी येथील फिडर वाहिनीचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जॅक्सन इन्फ्रा कंपनीला देण्यात आल्या आहेत. तसेच महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उद्या, १६ ऑक्टोबर रोजी निंबोडीला भेट देणार आहेत.
या आश्वासनानंतर १६ ऑक्टोबर रोजी पारवडी उपकेंद्रासमोर गुराढोरांसह करण्यात येणारे हलगी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. लोकव्हिजन न्यूजच्या बातमीबद्दल ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले असून, वीजपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत ठेवण्याची मागणी केली आहे.







