भालाफेक आणि थाळीफेकमध्ये रोहित कळसकरची चमक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
(निलेश मोरे)
इंदापूर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत भिगवण येथील राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम व माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेत विद्यालयाच्या चार खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत यश संपादन करत पदकांची कमाई केली. यापैकी रोहित कळसकर याची भालाफेक आणि थाळीफेक या दोन क्रीडा प्रकारांत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ९ व १० ऑक्टोबर २०२६ रोजी इंदापूर येथे तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा २०२६-२७ आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत विद्यालयाच्या खेळाडूंनी आपल्या क्रीडाकौशल्याच्या जोरावर लक्षवेधी कामगिरी केली.
विद्यालयातील १९ वर्षांखालील मुलांच्या गटात रोहित शांताराम कळसकर याने भालाफेकमध्ये प्रथम क्रमांक, थाळीफेकमध्ये द्वितीय क्रमांक आणि गोळाफेकमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. त्याच्या या कामगिरीमुळे भालाफेक व थाळीफेक या दोन्ही प्रकारांत त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१४ वर्षांखालील मुलींच्या गटात पायल अजिनाथ धुमाळ हिने लांब उडीमध्ये तृतीय क्रमांक मिळवला. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात श्रावणी मनोहर घायाळ हिने भालाफेकमध्ये, तर भाग्यश्री बाबासो खारतोडे हिने थाळीफेकमध्ये तृतीय क्रमांक पटकावत विद्यालयाच्या यशात भर घातली.
या सर्व खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक रुपेश भालेराव सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीला स्पर्धेत यशाचे फळ मिळाले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बापूराव थोरात, सचिव विजय थोरात, प्राचार्या सौ.वंदना थोरात तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या रोहित कळसकर याला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.







