सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुस्ती स्पर्धेत ८२ किलो वजन गटात दमदार कामगिरी
(निलेश मोरे)
मदनवाडी (ता. इंदापूर) येथील पै. चैतन्य मनोहर बंडगर याने कुस्ती क्षेत्रात दमदार कामगिरी करत गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत ८२ किलो वजन गटात उल्लेखनीय कामगिरी करत चैतन्य बंडगर यानी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.
कुस्तीची समृद्ध परंपरा असलेल्या मदनवाडी गावाच्या नावलौकिकात चैतन्य याच्या या यशामुळे आणखी भर पडली आहे. कुस्तीच्या आखाड्यात त्यांनी ताकद, चपळाई, आत्मविश्वास तसेच कौशल्यपूर्ण डावपेचांचे प्रभावी प्रदर्शन केले. त्यांच्या या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.
चैतन्य बंडगर हे माळशिरस तालुक्यातील खुडूस येथील महादेव ठवरे यांच्या गोदबा पाटील कुस्ती केंद्रात सराव करत आहे. त्याच्या कुटुंबाला चार पिढ्यांची कुस्तीची परंपरा असून, त्याचे बंधू पै.ओंकार बंडगर हेदेखील नामांकित पैलवान आहे. आदर्श सरपंच तुकाराम बंडगर यांच्या कुटुंबातील चैतन्य यांना घरातूनच कुस्तीचे संस्कार आणि मार्गदर्शन लाभले आहे.
विद्यापीठस्तरीय स्पर्धेत मिळवलेल्या या यशामुळे चैतन्य याची आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या यशामुळे मदनवाडीतील युवकांना कुस्ती क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळत आहे. चैतन्यच्या पुढील वाटचालीसाठी भिगवण पत्रकार संघ आणि धनाबाबा देवस्थानच्या माध्यमातून आवश्यक मदत व मार्गदर्शन करण्यात येईल, असे ज्येष्ठ पत्रकार दादासाहेब थोरात यांनी सांगितले.
दरम्यान, गावातील युवकांना कुस्तीची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना योग्य प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मदनवाडी येथे सुसज्ज तालीम उभारण्याचा मानस असल्याचे जिल्हा परिषद सदस्या मेघनाताई तुकाराम बंडगर यांनी सांगितले. चैतन्य बंडगर याच्या या यशामुळे मदनवाडीच्या कुस्ती परंपरेला नवी ऊर्जा मिळाली असून, राज्यस्तरीय स्पर्धेतही ते दमदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







