(संतोष पवार)
कुस्तीच्या मैदानात दमदार कामगिरी करत पळसदेव तालुका इंदापूर येथील पळसनाथ विद्यालयाच्या मल्लांनी यशाचा झेंडा फडकवला आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत विद्यालयाचे मल्ल राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेपर्यंत पोहचले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयातंर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सोलापूर आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वाखरी (पंढरपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भोसे तालुका पंढरपूर येथे राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कुस्ती स्पर्धेत १७ वर्षीय वयोगटात पळसनाथ विद्यालयाच्या ज्ञानेश्वरी शिंदे ४६ किलो वजनगट आणि गायत्री शिंदे ४९ किलो वजनगटातून प्रथम क्रमांक मिळवला. त्यांची ३१ ऑक्टोबर ते ०५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दिल्ली येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशामागे खेळाडूंची मेहनत सातत्यपूर्ण सराव आणि मार्गदर्शकांचे योगदान महत्त्वाचे ठरले. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा परंपरेत मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या मल्लांचे आणि त्यांचे क्रीडा मार्गदर्शक सिकंदर देशमुख, नितीन जगदाळे, सुवर्णा नायकवाडी, रामचंद्र वाघमोडे यांचे पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे , सचिव योगीराज काळे , संस्थेचे पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य ,पर्यवेक्षक यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत .






