सागर घरत
करमाळा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा (सन 2026-27) यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत तालुक्यातील एकूण 38 संघांनी सहभाग नोंदविला होता.
17 वर्षांखालील गटात शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय, कुंभारगावच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात नेताजी सुभाषचंद्र विद्यालय, केतूर या बलाढ्य संघाचा सामना करत कुंभारगावच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक व शिस्तबद्ध खेळ केला.
अत्यंत चुरशीच्या व रोमांचक झालेल्या या सामन्यात शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालयाच्या संघाने 5 गुणांच्या फरकाने विजय मिळवत तालुक्याचे विजेतेपद पटकावले. या उल्लेखनीय यशामुळे संघाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशामागे क्रीडा शिक्षक जगताप सर, सोनटक्के सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक आढाव सर व सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रोत्साहन व सहकार्य दिले.
संघाच्या या दैदिप्यमान यशाबद्दल विद्यार्थ्यांवर, प्रशिक्षकांवर व विद्यालयावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.







