निलेश मोरे
भिगवन- अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा भिगवन यांचेवतीने चालवल्या जाणाऱ्या छत्रपती पुरुष बचत गटाच्या अध्यक्षपदी व्यवसायाने कर सल्लागार असलेले श्री.गणेश बागल व सचिवपदी श्री. प्रदीप नांदगुडे यांची निवड छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालय भिगवन येथील कार्यालयामध्ये झालेल्या मीटिंगमध्ये सर्वानुमते करण्यात आली.
छत्रपती पुरुष बचत गट हा गेले दहा वर्षापासून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने चालवला जात असून यापूर्वी दीड कोटी व अडीच कोटी असे दोन बचत गट पूर्ण झालेले असून यावर्षी सहा वर्षासाठी प्रत्येक सदस्याकडून पाच हजार रुपये प्रति महिना बचत गोळा करून ती सभासदांना अत्यल्प कर्ज स्वरूपात वाटप करण्याचा निर्णय मीटिंगमध्ये घेण्यात आलेला असून बचत गट एकूण 60 सदस्यांचा केला आहे. सदर बचतीनुसार सहा वर्षांनी बचत गट साधारणपणे चार कोटीवर जाणार आहे.
सदर वेळी नवनियुक्त अध्यक्ष श्री गणेश बागल म्हणाले की ” आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून बचत गटाच्या अध्यक्षपदी माझी निवड केल्याप्रमाणे मी पारदर्शी पद्धतीने बचत गट पूर्णत्वाला नेहण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न सर्वांच्या सहकार्याने करेल ” असे सांगितले. तसेच सचिव श्री प्रदीप नांदगुडे यांनी बचत गटाबाबतची नियमावली व बचत गटाच्या फायद्याबाबत माहिती देऊन सदर बचत गटाचे कर्ज हे फक्त अर्धा टक्क्याने मिळते. सदर कर्ज प्रत्येक सभासदाला साधारणपणे पाच लाखापर्यंत वाटप करू शकतो. तसेच त्यांनी बचत गटांच्या नियमाबाबतची सविस्तर माहिती दिली.
सदर वेळी मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजकुमार मस्कर सर, जिल्हाध्यक्ष ॲड. पांडुरंग जगताप, तालुकाध्यक्ष श्री छगन वाळके, शाखा अध्यक्ष डॉ. संकेत मोरे, विकास वाघ, राजेंद्र वाघ, अभिनव वाघ, प्रमोद धुमाळ,नामदेव जगताप, भरत ननवरे,प्रशांत ढवळे, अर्जुन मिंडे, किरण लंगोटे इत्यादी सदस्य उपस्थित होते. सदर वेळी किरण लंगोटे यांनी पहिला बचत गटाचा हप्ता अध्यक्ष व सचिव यांच्याकडे जमा केला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.पांडुरंग जगताप व मार्गदर्शन राजकुमार मस्कर सर आणि डॉ. संकेत मोरे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री छगन वाळके यांनी केले.







