निलेश मोरे
भिगवण शहरातील मुख्य रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कोट्यवधी रुपयांच्या कामाचा पुरता बट्ट्याबोळ झाला असून, या रस्त्याच्या कामावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखेखाली सुरू आहे. या रस्त्यासाठी जवळपास पावणे सहा कोटी रुपयांचा निधी टाकण्यात आलेला आहे. या रस्त्याचे काम काही ठिकाणी पूर्ण होऊन काहीच काळ लोटला असतानाच रस्त्याला मोठे तडे गेले असून, ग्रामस्थांनी याबाबत नाराजी व्यक्त करीत संबंधित ठेकेदारावरती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पोलीस स्टेशन ते थोरात नगर यादरम्यानच्या मुख्य रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले असून या रस्त्याचे काही महिन्यातच दोन भाग झाल्याचे पाहायला मिळत आहे रस्त्याच्या मध्यभागी एक इंचापेक्षा जास्त अंतर पडल्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे काम ‘अ’ ठेकेदाराने स्वतः न करता ‘ब’ व्यक्तीला दिल्याने या कामाचा पूर्ण बट्ट्याबोळ झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणण आहे. टक्केवारीच्या आणि हलगर्जीपणाच्या कारभारामुळे संपूर्ण कामाचा दर्जा खालावला असून कोट्यवधी रुपयांच्या निधीचा चुराडा झाला आहे. कोट्ट्यावधी रुपयांच्या या सार्वजनिक कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धृतराष्ट्राची भुमिका घेतल्यामुळे ठेकेदाराचे धाडस अधिकच वाढले आहे.
काही ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे परंतु साईट पट्ट्या तशाच असल्यामुळे नागरिकांची कमालीची गैरसोय होत आहे. यामधून छोटे-मोठे अपघात घडत आहेत. यासंबंधी अधिकारी व ठेकेदाराला वेळोवेळी सूचना करून देखील ठेकेदाराकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. करदात्यांच्या पैशांची अशी उघडउघड उधळपट्टी आणि नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्यामुळे भिगवणकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.







