(संतोष पवार)
पळसदेव तालुका इंदापूर येथील पळसनाथ विद्यालयाने क्रीडा क्षेत्रातील आपली यशाची परंपरा कायम राखली आहे.विविध शालेय क्रीडा स्पर्धेतील यशाची घोडदौड सुरूच आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य द्वारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि इंदापूर तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पळसदेव येथील एस.बी. स्पोर्ट्स अकॅडमी येथे इंदापूर तालुका शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयाच्या मुलांच्या कबड्डी संघाने उल्लेखनीय यश मिळवले . इंदापूर तालुकास्तरीय शालेय कबड्डी सामन्यातील १४ वर्ष वयोगटाच्या अंतिम लढतीत छत्रपती हायस्कूल भवानीनगर संघाशी तर १७ वर्षे वयोगटातील अंतिम लढतीत वालचंद विद्यालय कळंब संघाशी अत्यंत चुरशीने लढत देत तालुका पातळीवर द्वितीय क्रमांक मिळवला.
याशिवाय जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे झालेल्या १९ वर्ष वयोगटातील शालेय विभागीय वुशो मार्शल आर्ट स्पर्धेत विद्यालयाची खेळाडू सृष्टी सावता बनसुडे या खेळाडुने उपविजेतेपद मिळवले . दरम्यान लोणी देवकर तालुका इंदापूर येथील आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती केंद्र येथे झालेल्या शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेतून तब्बल १३ मल्लांची प्रथम क्रमांक मिळवत शालेय जिल्हा कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडाक्षेत्रातील या उज्ज्वल यशाबद्दल सर्व यशस्वी खेळाडूंचे आणि विद्यालयातील मार्गदर्शक क्रीडाशिक्षक सिकंदर देशमुख, नितीन जगदाळे सुवर्णा नायकवाडी, रामचंद्र वाघमोडे यांचे पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे, सचिव योगीराज काळे , संस्थेचे सर्व पदाधिकारी विद्यालयाचे प्राचार्य ,पर्यवेक्षक यांनी अभिनंदन केले आहे.







