(निलेश मोरे)
विद्या प्रतिष्ठानच्या अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूल (चिंचोली, ता. दौंड) येथील साई रोहन जाधव याने ‘सीबीएसई साउथ झोन-II’ क्रिकेट चॅम्पियनशिप २०२६-२७ स्पर्धेत १४ वर्षांखालील (अंडर-१४) वयोगटात उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले आहे.
ही स्पर्धा २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२६ दरम्यान सिंहगड पब्लिक स्कूल, लोणावळा येथे पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गोवा या राज्यांसह पुद्दुचेरी, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांतील नामांकित शाळांच्या खेळाडूंनी भाग घेतला होता.
अंडर-१४ वयोगटात तब्बल ८३८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. नेटमधील पहिल्या चाचणीतून २५६ मुलांची, तर दुसऱ्या चाचणीतून अंतिम ७२ खेळाडूंची निवड करण्यात आली. या ७२ खेळाडूंचे चार संघ बनवून त्यांच्यात प्रत्येकी दोन सामने खेळवण्यात आले.
यातील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर अंतिम १८ खेळाडूंची सुवर्णपदकासाठी निवड झाली. साई जाधवने आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर या अटीतटीच्या निवडीत अव्वल स्थान पटकावून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
साईच्या या यशात शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता शिंदे, क्रीडाशिक्षक ओंकार देवकाते आणि नवनाथ इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्याला महाराष्ट्र रणजी संघाचे प्रतिनिधित्व केलेले क्रिकेट प्रशिक्षक जीवन वीरकर यांचे विशेष प्रशिक्षक म्हणून मोलाचे योगदान मिळाले. साईच्या या दैदिप्यमान यशाबद्दल स्वामी चिंचोली, भिगवण परिसरासह सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.







