(संतोष पवार)
शिक्षकांच्या प्रश्नांसाठी गेल्या ३३ वर्षांपासून सातत्याने संघर्ष करणारे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव तथा राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा आवाज म्हणून ओळखले जाणारे प्राचार्य नंदकुमार पंढरीनाथ सागर यांनी पुणे शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी विभागीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचा अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल करताना पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील संघटनांचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
या शक्तिप्रदर्शनातून शिक्षकांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत ठाम आवाज उठविण्यासाठी संघटित ताकद उभी असल्याचा संदेश देण्यात आला.
केवळ आमदारकीची निवडणूक लढवायची म्हणून आपण या मैदानात आलो नसून, गेली ३३ वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करताना शिक्षक, विद्यार्थी आणि शाळांच्या प्रश्नांसाठी केलेल्या संघर्षाला आता विधान परिषदेचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने उमेदवारी दाखल केल्याचे प्राचार्य सागर यांनी सांगितले. महाराष्ट्रातील मराठी माध्यमाच्या तसेच ग्रामीण भागातील शाळा सक्षम राहिल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे आणि शिक्षकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळाले पाहिजेत, यासाठी विधान परिषदेत शिक्षकांचा खरा प्रतिनिधी असणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी माध्यमाच्या शाळांबाबत शासनाच्या धोरणावर भाष्य करताना प्राचार्य सागर यांनी १५ मार्च २०२४ च्या संचमान्यता शासन निर्णयाचा संदर्भ दिला. या निर्णयामुळे मराठी माध्यमाच्या सुमारे ७५० शाळा बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. तीन किलोमीटरच्या परिसरातील शाळा बंद करण्याच्या धोरणालाही शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध केला. या संघर्षामुळे संचमान्यतेला दोन वर्षांची स्थगिती मिळाली आणि शिक्षक सरप्लस करण्याची किंवा शाळा बंद करण्याची प्रक्रिया थांबली, असे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील शाळांमध्ये गुणवत्ता नाही किंवा विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने त्या शाळांचे महत्त्व कमी होते, ही मानसिकता चुकीची असल्याचे सागर यांनी ठामपणे सांगितले. ग्रामीण भागातील शिक्षकांनी गेल्या अनेक दशकांत असंख्य विद्यार्थ्यांना घडविले असून, याच शाळांमधून शिकलेले विद्यार्थी आज प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि उच्च पदांवर कार्यरत आहेत.
त्यामुळे ग्रामीण आणि मराठी माध्यमाच्या शाळांकडे दुय्यम नजरेने पाहण्याऐवजी त्यांना सक्षम करण्याची गरज आहे.
शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्नही गंभीर असून, २५, ५०, ७५ आणि १०० टक्के अनुदान देण्याची प्रचलित पद्धत असताना अनेक शिक्षक अद्याप पूर्ण अनुदानापासून वंचित आहेत. २००० पासून सुरू असलेल्या या प्रश्नाला अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही. शिक्षकांना त्यांचे हक्काचे अनुदान मिळवून देण्यासाठी विधान परिषदेत संघर्ष करण्याची ग्वाही सागर यांनी दिली.
जुनी पेन्शन योजना हा शिक्षकांच्या जीवनाशी जोडलेला अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याचे सांगत त्यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका मांडली. आयुष्यभर विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकाला सेवानिवृत्तीनंतर आर्थिक आणि आरोग्याच्या अडचणींचा सामना करावा लागणे ही राज्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. शिक्षकांना त्यांच्या हक्काची जुनी पेन्शन मिळेपर्यंत हा लढा रस्त्यापासून विधानभवनापर्यंत सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
टीईटीच्या प्रश्नावरही त्यांनी शिक्षकांवर वारंवार अविश्वास दाखविण्याची गरज काय, असा सवाल केला. शिक्षकांनी कायद्यानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून सेवा बजावली आहे. शिक्षकांची परीक्षा घ्यायला आम्ही घाबरत नाही; मात्र केवळ शिक्षकांनाच वारंवार संशयाच्या नजरेने का पाहिले जाते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिक्षकांचा सन्मान कमी करण्याऐवजी त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना विश्वास आणि प्रतिष्ठा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे शिक्षक मतदारसंघातील प्रत्येक शाळेपर्यंत आपण आणि आपले कार्यकर्ते पोहोचले असून, ही तयारी निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुरू झालेली नाही. गेल्या तीन दशकांपासून शिक्षण क्षेत्रात काम करत असल्याने प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक शाळेतील आणि शिक्षकांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव आहे.
त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात कितीही उमेदवार असले तरी शिक्षकांचा विश्वास आपल्या पाठीशी असून आपला विजय निश्चित आहे, असा आत्मविश्वास प्राचार्य सागर यांनी व्यक्त केला.
शिक्षकांचा आमदार शिक्षकच हवा’ या भूमिकेतून आपण ही निवडणूक लढवत असून, शिक्षकांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत केवळ आवाज उठविणार नाही तर त्या प्रश्नांचा निकाल लागेपर्यंत संघर्ष करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने झालेल्या या शक्तिप्रदर्शनातून शिक्षकांच्या हक्कासाठीची पुढील लढाई अधिक आक्रमक होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले.







