(संतोष पवार)
डॉ.विश्वनाथ कराड विश्वशांती विद्यापीठ पुणे यांच्या वतीने पळसदेव तालुका इंदापूर येथे ग्रामीण तादात्म्य कार्यक्रमांतर्गत तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
ग्रामीण तादात्म्य अंतर्गत शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयात करण्यात आली होती. विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या शहरी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील जीवनाचा अनुभव देणे , ग्रामीण भाग आणि येथील असणारे साहित्य सांस्कृतिक सामाजिक जीवनाचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता यावा या उद्देशाने अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते. त्या अनुषंगाने कोथरूड पुणे येथील एमआयटीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी पळसदेव येथे तीन दिवस विविध शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.
पळसदेव येथील ग्रामीण भागातील कुटुंबातील जीवन व्यवस्था व कुटुंबाचे सर्वेक्षण तसेच आणि खरंच आपण आधुनिक आहोत का ? या विषयावर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरण करत सामाजिक प्रबोधन केले पळसदेव ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन त्या ठिकाणच्या कामकाजाची माहिती घेत गावात श्रमदान शिबिर आयोजित केले. दरम्यान या विद्यार्थ्यांनी पळसनाथ प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत विविध शैक्षणिक अध्ययन अध्यापन कृती सादर केल्या. पळसनाथ विद्यालयात साजरा झालेल्या महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवत राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेम जागृती केली.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रभावी डिजिटल पद्धतीने अध्ययन अनुभव घेता यावा यासाठी एक शैक्षणिक मदत म्हणून एमआयटी विद्यापीठाकडून डिजिटल संगणक संच विद्यालयास भेट देण्यात आला. ग्रामीण तादात्म्य शिबिर व उपक्रम यशस्वी होण्यासाठी एमआयटीचे डॉ.अतुल एलगंदेलवार, प्रोफेसर श्रीकांत यादव, डॉ सुरभी राजदान, डॉ. बी.साहु यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी एमआयटी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी ,पळसनाथ विद्यालयाचे पर्यवेक्षक, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर विद्यार्थी उपस्थित होते.







