शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
सागर घरत
कुंभारगाव येथील शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील, शिस्तप्रिय व विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक श्री. विठ्ठल दवणे सर यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्वेरी (SVERI) व स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ सप्टेंबर रोजी कुर्डूवाडी येथील तुळजाई लॉन्समध्ये करमाळा, माढा व बार्शी तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात श्री. विठ्ठल दवणे सर यांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या दवणे सर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ, शिस्तप्रियता व विविध उपक्रमांमधील सक्रिय सहभाग यामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना दवणे सर म्हणाले, “विद्यार्थ्यांसाठी अनेक वर्षे केलेल्या कार्याची ही पावती असून, हा सन्मान भविष्यात आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे.”
या कार्यक्रमास विविध विद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दवणे सर यांना प्राप्त झालेल्या या मानाच्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.







