सागर घरत
सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, सोलापूर यांच्या वतीने पंढरपूर येथे आयोजित कार्यक्रमात करमाळा तालुक्यातील शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय, कुंभारगाव या शाळेला जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार पुणे विभाग शिक्षक आमदार श्री. जयंत आसगावकर यांच्या हस्ते तसेच मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. तानाजी माने आणि संघाचे मार्गदर्शक श्री. सुभाषराव माने यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. नानासाहेब आढाव पाटील, शिक्षक व कर्मचारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मुख्याध्यापक श्री. नानासाहेब आढाव पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शाळेत विविध शैक्षणिक व गुणवत्तावर्धक उपक्रम राबविण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ, दहावीच्या परीक्षेतील शंभर टक्के निकालाची परंपरा, शिष्यवृत्ती परीक्षेतील यश, तसेच शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये झालेली प्रगती या बाबींची दखल घेऊन विद्यालयाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक श्री. नानासाहेब आढाव पाटील म्हणाले की, “हा सन्मान संपूर्ण शिक्षकवृंद, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित आहे. भविष्यातही शाळा अशाच प्रकारे शैक्षणिक क्षेत्रात यशाची नवी शिखरे गाठेल.”
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शाळांना दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार असून, त्यामुळे शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय, कुंभारगावची शैक्षणिक गुणवत्ता व सकारात्मक शैक्षणिक वातावरण अधिक दृढ झाले आहे. शाळेला मिळालेला हा सन्मान संपूर्ण करमाळा तालुक्यासाठी अभिमानाची व गौरवाची बाब मानली जात आहे.
या प्रसंगी मुख्याध्यापक संघाचे माजी सचिव श्री. बापूसाहेब निळ तसेच संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनील शिंदे उपस्थित होते.







