शेटफळ गडे येथे भीषण अपघात; बुलेटस्वार तरुणाचा मृत्यू
निलेश मोरे
बारामती-भिगवण मार्गावरील शेटफळ गडे गावच्या हद्दीत, कोठारी फार्मजवळ रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बुलेट आणि चारचाकी वाहनामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात बुलेटस्वार तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. साहिल प्रवीण भोसले (वय २५, रा. उद्धट) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साहिल भोसले हा आपल्या ताब्यातील बुलेट (क्रमांक एमएच ४२ बीटी ०००७) वरून बारामतीहून भिगवणच्या दिशेने जात होता. कोठारी फार्मजवळील धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्याच्या बुलेटला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की साहिल गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच ‘आपुलकीची जागा रुग्णवाहिका सेवा’चे संचालक केतन वाघ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी साहिलला उपचारासाठी भिगवण येथील लाईफ लाईन आय.सी.यू. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघातानंतर धडक देणारे अज्ञात चारचाकी वाहन घटनास्थळावरून पसार झाले असून, वाहनासह चालकाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
दोन वर्षांत कुटुंबातील तिन्ही आधार हरपले
या अपघातामुळे भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी साहिलच्या आई-वडिलांचाही दुचाकी अपघातात मृत्यू झाला होता. आई-वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाचा आधार असलेल्या साहिलचाही अपघाती मृत्यू झाल्याने भोसले कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
या दुर्दैवी घटनेने उद्धट, घोलपवाडी, पवारवाडी तसेच भिगवण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघाताची खबर सौरभ प्रदीप भोसले यांनी दिली. पुढील तपास पोलीस हवालदार नानासाहेब सूर्यवंशी करीत आहेत.







