निलेश मोरे
भिगवण : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या वतीने आयोजित सन २०२५-२६ पुणे जिल्हास्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत आदर्श माध्यमिक विद्यालय, भिगवणचा विद्यार्थी आदित्य आशिष कुंभार याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
वुशू या क्रीडा प्रकारातील कौशल्य, चपळता, शारीरिक क्षमता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आदित्यने स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली. जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत त्याने आपल्या शाळेसह भिगवण परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
आदित्यच्या या यशामुळे आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांसाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळत असल्याचे या यशातून अधोरेखित झाले आहे.
आदित्यच्या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, क्रीडा मार्गदर्शक, पालक तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले. भविष्यातही आदित्यने अशीच उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचे व परिसराचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.







