आठ मच्छिमारांचे प्राणांतिक उपोषण; ठेका कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी
निलेश मोरे
उजनी जलाशयातील प्रस्तावित मासेमारी ठेका कायमस्वरूपी रद्द करावा, या मागणीसाठी स्थानिक पिढीजात मच्छिमार आणि भूमिहीन धरणग्रस्तांच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा उद्या, मंगळवार (दि. १५) पासून पुण्यात सुरू होणार आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या पुणे येथील कार्यालयाच्या आवारात आठ मच्छिमार प्राणांतिक उपोषणास बसणार असून, त्यात तीन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उजनी परिसरातील शेकडो मच्छिमार दररोज पुण्यात उपस्थित राहणार असल्याची माहिती उजनी मच्छिमार बचाव अभियान’च्या वतीने देण्यात आली.
उपोषणकर्त्यांमध्ये चंद्रकांत भोई, बलभीम भोई, अनिता नगरे, पोपट नगरे, नवनाथ परदेशी, संजय सल्ले, दीपाली डिरे आणि मंदा काळे यांचा समावेश आहे.
हजारो कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न
उजनी जलाशयातील मासेमारी व्यवसायावर केवळ मच्छिमारच नव्हे, तर आडतदार, व्यापारी, किरकोळ विक्रेते, जाळी व्यावसायिक, तोडाई कामगार तसेच हॉटेल व्यावसायिक अशा मोठ्या रोजगार साखळीचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे प्रस्तावित मासेमारी ठेक्याचा परिणाम हजारो कुटुंबांच्या रोजगारावर होणार असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
कृष्णा खोरे विकास महामंडळाने उजनी जलाशयातील मासेमारी आणि त्यासंबंधित संपूर्ण साखळीबाबत स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) काढली आहे. शासन एकीकडे रोजगारनिर्मितीचे धोरण राबवत असल्याचे सांगत असताना, दुसरीकडे स्थानिक पिढीजात मच्छिमारांचा सुरू असलेला रोजगारच हिरावून घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप मच्छिमारांनी केला आहे.
४५ गावांत लाक्षणिक उपोषण
या निर्णयाच्या विरोधात उजनी परिसरातील ४५ गावांमध्ये गेल्या आठवड्यात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर प्रस्तावित ठेका प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. मात्र, केवळ स्थगिती नको, तर प्रस्तावित मासेमारी ठेका कायमस्वरूपी रद्द करावा, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
‘मायबाप सरकार…’ बॅनर चर्चेत
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी तयार केलेला भावनिक आणि उपरोधिक बॅनर उजनी परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. ‘मायबाप सरकार… आमच्या उन्हातान्हातील, थंडी-पावसातील कष्टाची, श्रमाची भाकर, कालवण पण तुम्हाला पुराणं व्हय…’ अशा उपरोधिक शब्दांत मच्छिमारांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत.
‘आम्हाला भाकरी व रोजगार द्या, मुलांच्या शिक्षणाची आणि त्यांच्या लग्नकार्याची व्यवस्था करा आणि बिनधास्त ठेका काढा,’ असा सवाल करत, ‘नाहीच काही देता आलं तर अंत्यसंस्कारासाठी जळण तरी तयार ठेवा,’ असा संतप्त इशाराही या बॅनरमधून देण्यात आला आहे.
‘आपण रोजगाराच्या वल्गना करता आणि इथे उपलब्ध असणारा रोजगार काढता, प्रजेने आता जायचे तरी कुठे?’ असा सवालही मच्छिमारांनी उपस्थित केला आहे.
निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
शासनाने तातडीने हस्तक्षेप करून उजनी जलाशयातील प्रस्तावित मासेमारी ठेका रद्द करावा, अशी मागणी मच्छिमार संघटनेने केली आहे. शासनाने वेळेत निर्णय घेतला नाही, तर आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढविण्याचा इशारा चंद्रकांत भोई, बाळासाहेब काळे, दत्तात्रय व्यवहारे, बाळासाहेब गाडेकर, शरद गलांडे, अनिल नगरे, नानासो दरदरे, युवराज नगरे, बलभीम भोई, प्रवीण दरदरे, सचिन जाडकर, उत्तम दरदरे, सद्गुरू शिंदे, बापुराव भोई, अंगत गायकवाड, शिवाजी भोई, सचिन तिकोने, संजय दरदरे, उमेश दरदरे, शरद गाडेकर आदींनी दिला आहे.







