पाच जणांविरुद्ध दौंड पोलिसांत गुन्हा दाखल; कुटुंबातील इतरांनाही मारहाणीचा आरोप
निलेश मोरे
दौंड : स्वामीचिंचोली (ता. दौंड) गावच्या हद्दीत मोकळ्या जागेच्या वापरावरून विचारणा केल्याच्या कारणातून झालेल्या वादात ६५ वर्षीय शेतकऱ्यास लोखंडी पाइपने मारहाण करून जखमी केल्याची घटना सोमवार, दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुभाष रघुनाथ कांबळे (वय ६५, रा. स्वामीचिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून प्रविण निवृत्ती कांबळे, बलभीम राजेंद्र कांबळे, प्रताप प्रविण कांबळे, सुरेखा प्रविण कांबळे आणि मंदा राजेंद्र कांबळे (सर्व रा. स्वामीचिंचोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष कांबळे यांनी प्रविण कांबळे यांना त्यांच्या आजी शेवबाई माणिक कांबळे यांच्या नावावर असलेली मोकळी जागा तुम्ही का वापरत आहात, अशी विचारणा केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला.
या वादादरम्यान बलभीम कांबळे व प्रताप कांबळे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर प्रविण कांबळे यांनी हातातील लोखंडी पाइपने सुभाष कांबळे यांच्या दोन्ही हातांवर मारहाण करून दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, सुरेखा कांबळे व मंदा कांबळे यांनी सुभाष कांबळे यांच्यासह त्यांच्या पुतण्याला, भावजयला व मुलाला शिवीगाळ करून हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर सुभाष कांबळे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. रावणगाव पोलीस चौकीकडून प्राप्त झालेल्या फिर्यादी जबाबाच्या आधारे दौंड पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई केली.
विविध कलमांन्वये गु.र. नं. ६८१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), १८९(२), १९०, १९१(२), ३५१(२) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक/२३०६ बाळासाहेब पानसरे करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार/३११ सागर म्हेत्रे यांनी केली.







