निलेश मोरे
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करत स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्याचे अनेकांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरते. खडकी (ता.दौंड) येथील मोहिनी गुणवरे यांनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत यश मिळवत महसूल सहाय्यक अधिकारीपदी निवड होण्याचा मान मिळविला आहे.
मोहिनी गुणवरे यांच्या या यशामुळे खडकी गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
जिल्हा परिषद शाळेतून शिक्षणाची सुरुवात झाल्यानंतर मोहिनी यांनी उच्च शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. मर्यादित साधनसुविधा, ग्रामीण भागातील वातावरण आणि विविध अडचणींवर मात करत त्यांनी अभ्यासात सातत्य कायम ठेवले. नियोजनबद्ध अभ्यास, वेळेचे योग्य व्यवस्थापन, नियमित सराव आणि आत्मविश्वास या जोरावर त्यांनी MPSC परीक्षेत यश मिळविले.
जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अधिकारीपद मिळवल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही स्पर्धा परीक्षांबाबत आत्मविश्वास निर्माण झाला आहे. परिस्थिती कोणतीही असो, मेहनत आणि जिद्द असेल तर यश मिळवता येते, हे मोहिनी यांच्या यशातून अधोरेखित झाले आहे.
मोहिनी गुणवरे यांच्या निवडीबद्दल कुटुंबीय, शिक्षक, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच खडकी ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त होत आहेत.







