सागर घरत
करमाळा : कुंभारगाव येथील सर्वसामान्य कुटुंबातील कन्या कु. निशिगंधा गोरख राजेभोसले हिने आपल्या जिद्द, सातत्य आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत तिने दोन शासकीय पदांवर निवड होण्याचा मान मिळवला आहे.
निशिगंधा राजेभोसले हिची यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदावर निवड झाली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) महसूल सहाय्यक पदासाठी तिची निवड झाली आहे. या दुहेरी यशामुळे तिच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे हे यश असून, कुंभारगावसारख्या ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये निशिगंधाचे नाव विशेष अभिमानाने घेतले जात आहे. तिच्या मेहनतीने आणि चिकाटीने अनेक युवक-युवतींसमोर आदर्श निर्माण केला आहे.
निशिगंधा हिच्या या यशाबद्दल कुंभारगाव ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच पंचक्रोशीतील नागरिकांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत असून, तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



