अट्टल चोरटा जेरबंद; ₹१ लाख ७६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
निलेश मोरे
भिगवण परिसरातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या इलेक्ट्रीक मोटारींच्या कॉपर केबल चोरीच्या घटनांमुळे त्रस्त झालेल्या शेतकरी वर्गाला भिगवण पोलिसांच्या दमदार कारवाईमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शेतातील विहिरींवरील इलेक्ट्रीक मोटारींच्या केबल चोरी करणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, त्याच्याकडून १८ शेतकऱ्यांच्या चोरीस गेलेल्या तब्बल १ लाख ७६ हजार २५० रुपये किमतीच्या कॉपर केबलचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मदनवाडी परिसरातील शेतकरी पांडुरंग मारुती बंडगर यांच्या शेतातील विहिरीवरील तीन पानबुडी मोटारींना जोडलेली फिनोलेक्स कंपनीची ७० मीटर कॉपर केबल, किंमत ११ हजार २०० रुपये, दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री चोरीला गेली होती. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भिगवण परिसरात शेतकऱ्यांच्या मोटारींच्या केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी शेतकऱ्यांशी संबंधित गुन्ह्यांचा तातडीने तपास करून ते उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच मदनवाडीतील दक्ष नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी टिंकु रामसेवक राजपूत (वय ३१, मूळ रा. आग्रा, उत्तर प्रदेश, सध्या रा. मदनवाडी, ता. इंदापूर) याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
अटक आरोपीकडून भिगवण पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
गुन्हा रजि. नं. २२८/२०२६ – भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२).गुन्हा रजि. नं. २२९/२०२६ – भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२).
या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान चोरीस गेलेल्या १८ शेतकऱ्यांच्या एकूण १ लाख ७६ हजार २५० रुपये किमतीच्या कॉपर केबलचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार नाना वीर, रामदास कर्चे, सचिन पवार, समीर झांबरे, सचिन भस्मे, शहाजी सुद्रीक तसेच मदनवाडीतील दक्ष नागरिकांनी या कारवाईत सहभाग घेतला.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार रामदास कर्चे करीत आहे







