कष्टकरी कुटुंबातील लेकीची अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी; तक्रारवाडीच्या धनश्रीने मिळवला ‘उत्कृष्ट बालकलाकार’ पुरस्कार
निलेश मोरे
भिगवण : परिस्थितीशी दोन हात करत स्वप्नांना गवसणी घालणाऱ्या तक्रारवाडी येथील धनश्री गजानन भोसले हिने अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सन २०२४ मधील ६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात धनश्रीला ‘उत्कृष्ट बालकलाकार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कष्टकरी कुटुंबातील या मुलीच्या यशामुळे तक्रारवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
धनश्रीचे वडील गजानन भोसले हे रिक्षाचालक असून, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते अथक परिश्रम घेतात. रिक्षा चालविण्यासोबतच गावच्या कचरा गाडीवर चालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही त्यांनी मुलीच्या कलागुणांना प्रोत्साहन देत तिच्या स्वप्नांना बळ दिले.
मुलीने आयुष्यात मोठे यश मिळवावे, या उद्देशाने गजानन भोसले यांनी आपल्या परिस्थितीची पर्वा न करता धनश्रीला पाठिंबा दिला. त्यांच्या या पाठबळामुळे धनश्रीने अभिनय क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
निर्माते पुष्कराज बिऱ्हाडे यांच्या ‘सावित्रीच्या लेकी’ या चित्रपटात धनश्रीने महत्त्वाची भूमिका साकारली. मुलींच्या संघर्षाची आणि प्रेरणादायी प्रवासाची कथा मांडणाऱ्या या चित्रपटातील तिच्या अभिनयाची दखल घेत तिला राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात धनश्रीला कै. गजानन जहागिरदार पारितोषिक, रोख रक्कम आणि मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या सन्मानामुळे तिच्या अभिनय कारकिर्दीला नवी दिशा मिळाली आहे.
धनश्रीच्या आईला देखील अभिनयाची आवड असून, त्यांनी विविध शॉर्ट फिल्म्समध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे अभिनयाची आवड आणि कलेची प्रेरणा धनश्रीला घरातूनच मिळाली. आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे धनश्रीने आपल्या कलागुणांना वाव देत यशाचा टप्पा गाठला.
धनश्रीच्या या यशामुळे तिच्या कुटुंबीयांसह तक्रारवाडी परिसरात आनंदाचे वातावरण आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या धनश्रीकडून भविष्यातही उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.



