हल्ल्यासाठी दोन लाख रुपये दिल्याचे तपासात निष्पन्न;
(निलेश मोरे)
राणा शिपिंग कंपनीचे मालक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर पालखी महामार्गावर झालेल्या सशस्त्र हल्ला प्रकरणात बारामती तालुका पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात पार्थ वासुदेव अवथळे (वय १९, मूळ रा. पिंपरी गवळी, ता. खामगाव, जि. बुलढाणा; सध्या रा. कर्वेनगर, दत्तमंदिर, कॅनॉल रोड, स्पेन्सर चौक, पुणे) आणि ज्ञानदेव महादेव शिंदे (वय ५०, मूळ रा. वीट, ता. करमाळा, जि. सोलापूर; सध्या रा. साईलीला बिल्डिंग, स्वामी समर्थ मंदिरासमोर, थोरातनगर, भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे) यांना २० ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांनाही २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी पायलट ढाब्यासमोर पालखी महामार्गावर राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी शस्त्रांसह हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेप्रकरणी लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १९ ऑक्टोबर रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता आणि आर्म्स ॲक्टच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पुणे शहर पोलिसांनी एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह पार्थ वासुदेव अवथळे याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोघांकडे केलेल्या चौकशीत ज्ञानदेव महादेव शिंदे याने हा गुन्हा करण्यासाठी दोन लाख रुपये दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तांत्रिक विश्लेषण आणि तपासाच्या आधारे पोलिसांनी पार्थ अवथळे आणि ज्ञानदेव शिंदे यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांचीही २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ल्यामागील नेमका हेतू काय होता, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार पुढील तपास करीत आहेत.







