एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचा उपक्रम; मोबाईल ॲम्बुलन्सद्वारे ग्रामीण भागात आरोग्यसेवा
(निलेश मोरे)
ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच दर्जेदार प्राथमिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने निंबोडी येथे मोबाईल ॲम्बुलन्सद्वारे फिरता प्राथमिक उपचार दवाखाना व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकूण ८१ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून हा उपक्रम राबविण्यात आला.
एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्रदादा पवार व सौ. सुनंदाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ६० रुग्णांची रक्तदाब (बीपी), तर २१ रुग्णांची मधुमेह (शुगर) तपासणी करण्यात आली. रुग्णांना आवश्यक आरोग्यविषयक सल्ला, प्राथमिक उपचार व औषधोपचारही उपलब्ध करून देण्यात आले.
शिबिरासाठी आलेल्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे लोकनियुक्त सरपंच संतोष सोनवणे यांनी आभार मानले. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच आरोग्यसेवा मिळावी, यासाठी अशा उपक्रमांची गरज असून भविष्यातही गावाच्या विकासासाठी व नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी निंबोडी आरोग्य उपकेंद्रातील आशा सेविका प्राजक्ता सुतार, आरोग्य अधिकारी विकास कापसे व अन्य मान्यवरांच्या हस्ते डॉक्टरांच्या पथकाचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे डॉ. राहुल सरोदे, दत्तात्रय कढणे, ट्रस्टचे विद्यार्थी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी संजय धुमाळ, सलीम मुलाने, तुषार सवाने, मृणाल भोसले, माऊली बाड, नामदेव बाड, रोहिदास लांडगे, गणेश काकडे, संतोष नगरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.







