पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने हल्ला; दोन अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
(निलेश मोरे)
बारामती विमानतळाजवळील पालखी महामार्गावर राणा शिपिंग कंपनीचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर पिस्तूलने गोळीबार करून सत्तूरने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. १८ ऑक्टोबर) सायंकाळी घडली. पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने जवळ येत दोन अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, पालखी महामार्गावरील विमानतळ रेल्वे पुलाच्या पुढे, पायलट ढाब्याजवळ राणा सूर्यवंशी उभे असताना कटफळच्या दिशेने स्कूटीवरून दोन अज्ञात व्यक्ती तेथे आल्या. स्कूटीच्या मागे बसलेल्या, अंगात जॅकेट आणि तोंडाला मास्क घातलेल्या व्यक्तीने पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने सूर्यवंशी यांच्या दिशेने पिस्तूलने गोळीबार केला. त्यानंतर सत्तूरने त्यांच्या उजव्या हाताच्या दंडावर वार केले. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या हाताच्या दंडाला तसेच पोटाच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार करीत आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण काय, हल्लेखोर कोण आहेत आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.







