‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला; सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
(निलेश मोरे)
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त गुजरातमधील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ परिसरात आयोजित राष्ट्रीय एकता परेडच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या विशेष पोलीस रॅलीचे भिगवण शहरात उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. विविध राज्यांतील पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सहभाग असलेल्या या रॅलीवर पुष्पवृष्टी करत भिगवणकरांनी जवानांप्रती आदर व्यक्त केला.
आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, पुद्दुचेरी तसेच अंदमान-निकोबार येथील पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सहभाग असलेली ही रॅली राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत मार्गक्रमण करत आहे. रॅली भिगवणमध्ये दाखल होताच ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला. भिगवण पोलीस स्टेशन, विविध सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांच्या वतीने रॅलीतील पोलीस जवानांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
या स्वागत सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ भिगवण, नेचरस् फाउंडेशन, सायकल क्लब भिगवण, भिगवण मेडिको असोसिएशन, पत्रकार संघ भिगवण, पुणे अकॅडमी, ध्येयपूर्ती अकॅडमी व परिसरातील विविध धार्मिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, शैक्षणिक अकादमींचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पुष्पवृष्टी आणि उत्स्फूर्त घोषणांच्या माध्यमातून जवानांचे मनोबल वाढविण्यासह राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि देशप्रेमाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







