भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी; एमएच ४२ एएस ८१२३ वाहनासह चालक ताब्यात
निलेश मोरे
शेटफळगढे हद्दीत बुलेटस्वार तरुणाला धडक देऊन अपघातानंतर फरार झालेल्या अज्ञात चारचाकी वाहनाचा शोध घेण्यात भिगवण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी अवघ्या सहा दिवसांत अपघाताचा छडा लावत एमएच ४२ एएस ८१२३ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी क्रॉस वाहनासह चालक वीरेंद्र मनोहर सोनवणे (वय ४७, रा. मोतीबाग, गुणवडी, ता. बारामती) याला ताब्यात घेतले.
१३ सप्टेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास बारामती-भिगवण मार्गावरील कोठारी फार्मजवळ हा अपघात झाला होता. साहिल प्रवीण भोसले (वय २५, रा. उद्धट, ता. इंदापूर) हे बुलेट क्रमांक एमएच ४२ बीटी ०००७ वरून भिगवणच्या दिशेने जात असताना अज्ञात चारचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात साहिल यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता फरार झाला होता.
अपघाताची घटना रात्रीच्या वेळी घडल्याने सीसीटीव्ही फुटेज स्पष्ट नव्हते, तसेच ग्रामीण भागात सीसीटीव्हीची उपलब्धता मर्यादित असल्याने पोलिसांसमोर वाहनाचा शोध घेण्याचे मोठे आव्हान होते. मात्र, भिगवण पोलिसांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याबरोबरच गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून माहिती संकलित केली.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अपघातातील वाहनाचा शोध घेतला. त्यानंतर चालक वीरेंद्र सोनवणे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने अपघात केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, साहिल भोसले यांनी यापूर्वीच आई-वडिलांचे छत्र गमावले होते. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात मोठी हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघात करून वाहनचालक फरार झाला तरी त्याचा शोध लागतो, असा संदेश या कारवाईतून नागरिकांमध्ये गेला आहे.
याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. २३०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पथकात नानासाहेब सूर्यवंशी, रामदास कर्चे, सचिन पवार, योगेश कुलकर्णी, तुषार रायकर व दत्तात्रय गवळी यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार नानासाहेब सूर्यवंशी करीत आहेत.


