उजनीचा प्रस्तावित मासेमारी ठेका कायमचा रद्द करण्याच्या मागणीसाठी पुण्यात आंदोलन; स्थगितीचे लेखी पत्र मिळाल्यानंतर उपोषण मागे
निलेश मोरे
उजनी जलाशयातील प्रस्तावित मासेमारी ठेका कायमचा रद्द करण्याच्या मागणीसाठी पुण्यातील सिंचन भवन परिसरात उपोषण करणाऱ्या मच्छीमारांच्या आंदोलनाला शुक्रवारी नाट्यमय वळण मिळाले. आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या मच्छीमार महिलांनी थेट कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक धनंजय धुमाळ यांच्या दालनात घुसून त्यांच्या टेबलवर बांगड्या फोडत निषेध व्यक्त केला. या प्रकारामुळे कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवला. दरम्यान, मच्छीमारांनी सिंचन भवनच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. मच्छीमार प्रतिनिधींनी जमावाला शांत करण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर वातावरण निवळले.
कार्यकारी संचालक धनंजय धुमाळ यांनी मच्छीमारांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. उजनीच्या प्रस्तावित मासेमारी ठेक्याला संबंधित मंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीबाबत अधिकृत लेखी पत्र देण्यात आले. तसेच, स्थानिक मच्छीमारांना विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन महामंडळाकडून देण्यात आले. त्यानंतर मच्छीमारांनी आपले उपोषण मागे घेतले.
मच्छीमार बचाव अभियानाला दिलेल्या पत्रात कृष्णा खोरे विकास महामंडळाने सोलापूर जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या स्तरावर ‘ईओआय’ला मंजुरी देऊन त्याची प्रसिद्धी करण्यात आली; मात्र आंदोलनकर्त्यांना हा विषय महामंडळाच्या अखत्यारीतील असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गैरसमज निर्माण होऊन कार्यकारी संचालकांच्या दालनात आक्रमक आंदोलनाचा प्रयत्न झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आंदोलन स्थगित करण्याबाबत महामंडळाने यापूर्वी पत्राद्वारे सूचना केली होती. त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नसल्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
उजनी जलाशयातील मासेमारी व्यवसायावर पारंपरिक मच्छीमार, भूमिपुत्र, पारधी समाजातील कुटुंबे तसेच व्यापारी, आडतदार, जाळी विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, तोडाई कामगार, वाहनचालक, बर्फ कारखानदार आणि इतर अनेक घटकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. प्रस्तावित ठेक्यामुळे हा रोजगार धोक्यात येण्याची भीती व्यक्त करत मच्छीमारांकडून सातत्याने आंदोलने करण्यात येत आहेत.
उजनी मच्छीमार बचाव अभियानाच्या वतीने चंद्रकांत भोई, संजय सल्ले, बलभीम भोई, नवनाथ परदेशी, अनिता नगरे आणि दीपाली डिरे हे १५ सप्टेंबरपासून उपोषणाला बसले होते.
तर बाळासाहेब काळे, अनिल नगरे, दत्तात्रय व्यवहारे, विक्रम शेलार, उज्ज्वला परदेशी, बाळासाहेब गाडेकर, शरद गलांडे, लतीफ काळे, संजय दरदरे, बापूराव भोई, अमोल पतुरे, युवराज नगरे आणि उत्तम दरदरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू होते. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या मच्छीमारांना बालाजी ग्रुपकडून तीन दिवस अन्न व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.


